उज्वला साळुंके / सांजवार्ता ऑनलाईन Feb 20, 2020
औरंगाबाद : यावर्षीही काही शाळांनी दहावीच्या परीक्षेत एकही विद्यार्थ्यांना परीक्षेला बसविले नाही. अशा विभागातील पंधरा शाळा आढळून आल्या आहेत. यामुळे बोर्डही संभ्रमात पडले असून बोर्डाने त्या शाळांना नोटिसा बजावल्या आहेत.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी बारावी परीक्षेत मागील चार वर्षांपासून अनेक शाळा-महाविद्यालयातुन दहावी परीक्षेला एकही विद्यार्थी परीक्षेला बसले नसल्याचे प्रकार समोर येत आहेत. यावर्षीही हा प्रकार कायम आहे. यावर्षी घेण्यात येणाऱ्या दहावी परीक्षेला एकूण पंधरा शाळेतील एकही विद्यार्थ्यांने परीक्षेला अर्ज भरलेले नाहीत. इयत्ता नववी नंतर विद्यार्थी गेले कुठे? , विद्यार्थ्यांना इतरत्र शाळेतून परीक्षेला बसविले की काय? असा प्रश्न बोर्डाला पडला आहे. बोर्डाच्या वतीने या शाळांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.बोर्ड मान्यता रद्द का करू नये?
दहावीच्या परीक्षेला एकही अर्ज न भरलेल्या पंधरा शाळांना बोर्डाच्या वतीने कारणे दाखवा नोटिसा तर बजावल्या आहेत. परंतु इयत्ता नववी नंतर विद्यार्थी गेले कुठे याची बोर्ड चौकशी करणार आहेत. याशिवाय या शाळेतून विद्यार्थीच परीक्षेला बसले नाहीत तर बोर्डाने या शाळांची बोर्ड मान्यता का रद्द करू नये? असा प्रश्नही बोर्डाच्या वतीने त्या शाळांसमोर उपस्थित केला आहे.याआधीही असेच प्रकार
२०१५ यावर्षीपासून एकही अर्ज न भरल्याचे प्रकार समोर येत आहेत. २०१५ यावर्षी १५३ शाळांनी दहावीला एकही विद्यार्थी परीक्षेला बसविले नव्हते. तसेच २०१६ यावर्षी ३४ शाळा तर २०१७ यावर्षी १२३ शाळांतुन एकही विद्यार्थी परीक्षेला बसले नव्हते. नववी नंतर या शाळेतील विद्यार्थी नेमके जातात कुठे? हा प्रश्न यावर्षीही कायम असून बोर्ड अशा शाळांची चौकशी करणार आहेत.